आनंद दिघेंचा मृत्यू घातपातामुळे नाही; नारायण राणेंच्या दाव्यामुळे निलेश राणे तोंडघशी

0
527

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांचा मृत्यू घातपातामुळे झालेला नाही, असे स्पष्ट करून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख व खासदार नारायण राणे यांनी याबाबतच्या चर्चेवर पडदा टाकला. राणेंच्या या खुलासामुळे त्यांचे पूत्र माजी खासदार निलेश राणे तोंडघशी पडले आहेत.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले की, दिघे यांच्या मृत्युबाबत मधल्या काळात काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत. त्यांचा मृत्यू घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहित आहे, त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे. यापुढे या गोष्टीवर चर्चा होणार नाही. निलेश राणेंना हे वास्तव सांगेन, असे राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले की, दिघेंची शेवटची भेट घेणारा मी होतो. मी दिघेंची भेट घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांची प्रकृती  खालावली होती. त्यानंतर बाळासाहेबांना फोन करून डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली. मात्र, मांडके येण्याआधीच दिघे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मी बाळासाहेबांवर याबाबत आधी जे आरोप झाले, त्याच्याशी सहमत नाही. या विषयावर पडदा पडला आहे, असे राणेंनी स्पष्ट केले.