Pimpri

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By PCB Author

March 20, 2023

पिंपरी, दि. २०(पीसीबी) आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचा १२ वा वर्धापनदिन तीन सत्रात मोठ्या उत्साहात चिंचवड येथे पार पडला. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, उपाध्यक्ष अशोक नागणे, कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विख्यात साहित्यिक आणि ज्येष्ठ व्याख्याते प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे यांनी ‘आनंदाने जगू या!’ या विषयावर श्रोत्यांना दोन तास जागेवर खिळवून ठेवले. “जीवनातील लहानमोठ्या घटनांमधून आनंद घेण्याची वृत्ती अंगी बाळगणे हेच आनंदी होण्याचे खरे सूत्र आहे!” असे प्रतिपादन करीत नामवंत प्रभृतींच्या जीवनातील प्रासंगिक विनोद अन् आनंदाचे क्षण कथन करून त्यांनी श्रोत्यांना हसतखेळत ठेवले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. शाम भुर्के यांनी ‘विनोदावर बोलू काही’ या विषयावर विख्यात विनोदी साहित्यिकांच्या गोष्टी सांगून श्रोत्यांना खळखळून हसवले. तिसर्‍या सत्रात ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी विविध गुणदर्शन या कार्यक्रमांतर्गत विविध कलांचे सादरीकरण केले. त्यामध्ये प्रेमलता कलाल आणि सहकाऱ्यांनी सकस अन्नाचे भारूड, उमा पाडुळकर आणि सहकारी यांचे ‘मराठी असे आमुची मायबोली’ हे लघुनाटक, पूनम गुजर यांचे नृत्य; तसेच अविस्मरणीय अनुभव सदरात प्रदीप वळसंगकर, नृसिंह पाडुळकर, प्रिया जोशी, वंदना बोरकर, कविता कोल्हापूरे, अश्विनी कोटस्थाने, ज्ञानेश्वर खेडकर, किरण गंगापूरकर आदींनी आपले अनुभवकथन केले. रवींद्र झेंडे यांनी उत्कंठावर्धक कथा सांगितली. रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. रवींद्र झेंडे यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी कोटस्थाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप वळसंगकर यांनी आभार मानले.