आनंदनगर काय पाकिस्तानात आहे का – नगरसेविका सीमा सावळे यांचा सवाल

0
962

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – चिंचवड स्टेशन आनंदनगरमध्ये कोरोनाचा प्रकोप झाला आहे. दरम्यान, येथील काही नागरिकांना कॅरंटाईन करण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॅलोजच्या होस्टेलचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला, त्याला प्राधिकरणातील काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यावर बोलताना भाजपा नगरसेविका सीमा सावळे यांनी विरोध करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. आनंदननगरच्या रहिवाशांना फक्त क्वाॅरंटाईन साठी विरोध अत्यंत चुकिचा आहे. ते या शहरातीलच रहिवासी आहेत, आनंदनगर काय पाकिस्तानात आहे का, असा सवाल सावळे यांनी उपस्थित केला आहे.

आनंदनगरच्या रहिवाशांना केवळ १४ दिवसांसाठी कॅरंटाईन करायचे असताना त्याला विरोध करणाऱ्या प्राधिकरणातील या लोकप्रतिनिधींची भूमिका एक प्रकारे समाजात फूट पाडणारी आहे, असे सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सांगितले. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि गोरगरिब जनतेचा अनादर करणारा आहे. आनंदनगरचे सुमारे तीन हजार रहिवासी हे १०० टक्के कष्टकरी आहेत. परिसरातील दवा बाजार, व्यापार संकुलांतून ते रोजंदारीवर काम करतात. इथे घरकाम कऱणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. गेल्या आठवड्यात या परिसरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आणि ४५-५० पर्यंत गेली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने तत्काळ काही नागरिकांचे अलगिकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याला सहकार्य करणे हे शहरातील प्रत्येक नागरिकाचे काम आहे. प्रत्यक्षात त्याला विरोध हा करंटेपणा आहे, असे सावळे यांनी म्हटले आहे.

आयुक्त हर्डीकर यांना एक निवेदन देऊन प्रशासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सावळे यांनी सांगितले. त्यात पुढे म्हटले आहे की, उद्या आकुर्डी-निगडी प्राधिकरणातील नागरिकांचा कचरा मोशीत टाकू देणार नाही, अशी भूमिका मोशी प्राधिकरणातील नागरिकांनी घेतली तर चालेल काय, असा अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे. देश, राज्य आणि अन्य शहराची तुलना करता पिंपरी चिंचवडमध्ये प्रशानाने ज्या पध्दतीने काम केले तसेच नागरिकांनी साथ दिली त्यामुळे कोरोना आटोक्यात आहे. बाजारपेठ खुली झाल्याने आता आगामी काळात त्याचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. झोपडपट्टीत आतापर्यंत कोरोना नव्हता, पण आता त्याचा प्रसार तिथेच होतो आहे. पूर्ण शहरासाठी ते घातक आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी कुठलाही असो त्याने शहर म्हणून एका कर्तव्य भावनेतून मदत केली पाहिजे. संकटाच्या काळात आपल्या शहरातील बांधवांच्या पाठीशी उभे रहायचे सोडून त्यांना विरोध करणे हे मानवतेच्या दृष्टीने अत्यंत चुकिचे आहे. जर कोणी विरोध करत असतील तर प्रशानाने तो मोडून काढावा, प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सीमा सावळे यांनी केली आहे.