Pimpri

आनंदनगरच्या कोरोना संशयितांची व्यवस्था आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील होस्टेलमध्ये

By PCB Author

May 23, 2020

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – चिंचवडस्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ च्या पुढे गेली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक लक्षणे असलेल्यांना आकुर्डीतील एका खासगी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ठेवले जाणार आहे. तेथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तेथे ६०० जणांची राहण्याची सोय आहे.

आनंदनगर या दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीत सर्वाधिक संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशी व संशयितांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. यासाठी त्यांना चिंचवड स्टेशन येथील पालिका शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र, तेथील जेवण व निवासाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे पालिकेने आकुर्डीतील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे वसतिगृह ताब्यात घेतले आहे. त्या ठिकाणी ६०० जणांची राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आनंदनगरमधील संशयितांना तपासणीसाठी त्या ठिकाणी ठेवले जाणार आहे. त्यांच्या घशातील द्रव नमुने तेथे घेतले जाणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्या रुग्णांना वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाणार असून, निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अजित पवार यांनी दिली आहे.