आधी लोकसभा जिंकायची, मग विधानसभेची चर्चा; अजित पवारांनी इंदापूरच्या जागेवरून कार्यकर्त्यांना सुनावले    

0
640

इंदापूर, दि. ४ (पीसीबी) – आधी लोकसभा जिंकायची आहे, मग विधानसभेबाबत चर्चा करु, असे उत्तर  राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना  दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला, तरच आघाडीच्या उमेदवारांचे काम करु, अशी भूमिका इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती.  यावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले.  

राज्यात  काँग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.  त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आम्ही आघाडीचे काम करणार नाही, असा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी  एका कार्यक्रमात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरच  घेतला होता.

यावर अजित पवारांना विचारले असता इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे? असा सवाल त्यांनीच उपस्थित केला. आम्ही लोकसभेच्या ४८ जागांबाबत चर्चा करत आहे. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.  त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा  पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.