आधी भाजपचा पराभव करू, त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करू – राहुल गांधी  

0
628

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीत आधी भाजपचा पराभव करायचा       त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करू,  अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांनी मांडून मित्रपक्षांची इच्छा असेल, तर आपण निश्चितपणे  पंतप्रधान  होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत आल्यास छोट्या उद्योजकांना आधार  देणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच कमी खर्चात वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. 

दिल्लीत एका कार्यक्रमात  बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल. पहिल्या टप्प्यात भाजपला पराभूत करणे हेच सर्वांचे लक्ष्य असेल. त्यानंतर यश आल्यावर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कोणाला करायचा,  याविषयी निर्णय घेतला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला  मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सध्या दोन समस्या आहेत. पहिली नोकऱ्या नाहीत आणि दुसरी म्हणजे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना सरकारने लक्ष्य केले आहे, असे सांगून राहुल यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि विदेश धोरणावर  टीका केली. आखाती देशांमध्ये तेलामुळे समृद्धी आली आहे. तशीच समृद्धी भारतात वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील सेवा उपलब्ध केल्याने येऊ शकते, असेही ते म्हणाले.