आधी पापण्यांवर तर आता हातावर कोरले नाव; शिवसाठी वीणाचे खास सरप्राइज

0
630

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – ‘बिग बॉस मराठी २’ या रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप हे लव्ह-बर्ड्स एकत्र आले. आता शो संपल्यानंतरही शिव-वीणाची प्रेमकहाणी जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही लोकप्रिय जोडी ठरत असून दोघांच्याही पोस्टवर चाहत्यांचे विशेष लक्ष असते. ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरेचा लवकरच वाढदिवस असून त्यासाठी वीणाने आधीच त्याला खास सरप्राइज दिले आहे.

बिग बॉसच्या घरात वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचे नाव कोरल्याचे पाहायला मिळाले होते. आता तिने तिच्या हातावर त्याचे नाव कोरले आहे. ‘शिव’ नावाचा टॅटू काढताना वीणाने इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडीओ केला होता. ‘राजा-राणीची प्रेमकहाणी आता सुरू झाली आहे,’ असे म्हणत शिवने वीणासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

अनेकांनी शिव-वीणाचे प्रेम म्हणजे केवळ बिग बॉस हा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट वाटला. मात्र शो संपल्यानंतरही हे दोघे सतत एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे.  ”शंभर टक्के प्रेक्षकांनी जे कार्यक्रमामध्ये ऐकले तेच होणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. माझ्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये झालेली कोणतीही गोष्ट शो जिंकण्यासाठी मी केली नाही,” असे शिवने शो जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. शिव-वीणा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे.