आधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या; मग मी चार वर्षांचा देईन- नरेंद्र मोदी

686

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – सरकार हे फक्त श्रीमंतांचे नसते, ते गरीबांचेही असते. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मंत्र असून आम्हाला भाजपाला मतदान न करणाऱ्यांचाही विकास करायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काही लोकांना आधी वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाकडे आहे. राजदरबारी एकाच कुटुंबासाठी गाणे गायचे, असे सांगत मोदींनी काँग्रेसलाही चिमटा काढला आहे. चहावाल्याला गादी मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाल्याची टीका त्यांनी केली आहे.

छत्तीसगडमध्ये अंबिकापूर येथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अंबिकापूरमध्ये आलो त्यावेळी तुम्ही माझ्या सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. पण हे पाहून काही लोकांना खरे वाटले नव्हते. मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण करु शकतात, हा विचारही लोक कसा करु शकतात, असा प्रश्न काही लोकांना पडला होता. अशा लोकांना उत्तर देण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळत आहे, असे मोदींनी सांगितले. काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला गादी (सत्ता) मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील चार पिढ्यांनी काँग्रेसचा अनुभव घेतला आहे. आधी तुम्ही या चार पिढ्यांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा, मग मी चार वर्षांचा हिशोब देईन, असे त्यांनी काँग्रेसला सुनावले.

छत्तीसगड राज्याची स्थापना झाली त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण छत्तीसगडाची स्थापना होताच येथील जनतेने भाजपाला निवडून दिले. हा तुमचा भाजपावरील विश्वास होता, असेही त्यांनी नमूद केले. इथे बसलेला एकही व्यक्ती नोटाबंदीमुळे रडत नाहीये, पण एका कुटुंबाचे नोटाबंदीवरुन रडगाणं सुरु आहे. जे लुटलंय ते देशात परत आले पाहिजे. तुम्ही काहीही करा, पण मोदी थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.