Desh

आधार क्रमांक शेअर करणे ट्रायच्या अध्यक्षांना महागात; वैयक्तिक माहिती उघड

By PCB Author

July 29, 2018

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवावे, असे आव्हान देऊन आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला  होता. मात्र, हे धाडस त्यांना महागात पडले आहे. कारण, आधार क्रमांक शेअर केल्यानंतर लगेच फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा करणाऱ्या इलिअट अल्डरसन याने शर्मा यांची वैयक्तिक माहिती उघड केली आहे.

इलिअट अल्डरसन याने शर्मा यांचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल क्रमांकच थेट ट्विट केला. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. त्यासाठी आपल्या ट्विटरवरून शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केला. आपल्याला यामुळे कोणतीही धोका  होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असे आव्हान शर्मा यांनी नेटिझन्सना दिले होते.

अल्डरसन याने शर्मा यांच्या १२ आकडी आधार क्रमांकाच्या आधारे एकामागोमाग एक ट्विट करत शर्मा यांच्या खासगी जीवनातील अनेक आकडे जाहीर केले. यामध्ये शर्मा यांच्या घराचा पत्ता, जन्मतिथी, फोन क्रमांक इत्यादींचा समावेश आहे. इतकंच काय तर शर्मा यांचे खासगी फोटोही हॅकरने शोधले आणि ट्विट केले.