आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास दहा हजारांचा दंड

0
546

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ’इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती.

त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. ’इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम २७२ नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम एक सप्टेंबर २०१९ पासून लागू होण्याची शक्यता आहे. कराचा भार टाळण्यासाठी नागरिकांनी चुकीचा आधार नंबर नोंदवू नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

बँकेच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात आधार नंबर दिसला नाही अथवा चुकीचा असेल तरीही त्या ग्राहकाला दहा हजारांचा दंड होणार असल्याचे एका बँक आधिकाऱ्याने सांगितले. दहा हजारांचा दंड लावण्याच्या आधी संबंधित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. पण बँकेतील सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज लागणार नाही.