Chinchwad

आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने कस्पटेवस्तीतील वृध्देला हजारोंचा गंडा

By PCB Author

December 05, 2018

वाकड, दि. ५ (पीसीबी) – आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका ७४ वर्षीय वृध्देला अज्ञाताने ३९ हजार ९४० रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना कस्पटेवस्ती येथील वृध्देच्या घरी घडली.

अरुध्दती तारानाथ जेरे (वय ७४, रा. निसर्ग सृष्टी अपार्टमेंट, कस्पटेवस्ती, वाकड) असे फसवणूक झालेल्या वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.३१ ऑक्टोबर) फिर्यादी वृध्द महिला अरुध्दती जेरे यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने स्टेट बँक ऑफ इंडिया केशवापुर शाखा (मेन) हुबळी येथून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर आरोपीने अरुध्दती यांचा विश्वास संपादन करुन त्यांचा आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डची माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यातील एकूण ३९ हजार ९८० रुपयांना गंडा घतला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.