आदिवासी विभागात दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा – उत्तम जानकर

0
948

पंढरपूर, दि. १२ (पीसीबी) – राज्यातील आदिवासी समाजाची बोगस लोकसंख्या  दाखवून आदिवासी विभागाने दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा केला आहे, असा सनसनाटी आरोप सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य उत्तम जानकर यांनी केला आहे. गेल्या ३८ वर्षापासून हा घोटाळा सुरु असून  माहिती अधिकारात हा घोटाळा उघडकीस आला आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जानकर यांनी केली आहे.

पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. यावेळी जानकर म्हणाले की, धनगर  समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार नुसती खोटी आश्वासने देत आहे. राज्यातील एसटी समाजाची लोकसंख्या जिल्हा निहाय किती आहे, याची  माहिती आदिवासी विभागाकडून माहिती आधिकाराखाली मागितली होती.  माहिती  मिळाल्यानंतर फुगवून दाखवलेल्या लोकसंख्येमुळे आदिवासी विभागाचा आरक्षण महाघोटाळा उघडकीस आला आहे, असे ते म्हणाले.

१९८१ ते २०११ पर्यंत आदिवासी विभागाने महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या ८० लाख इतकी असल्याचे म्हटले आहे. यामध्ये तब्बल १९ लाख ५० हजार आदिवासी लोकसंख्या बोगस असल्याचे दिसून येत आहे, असे जानकर यांनी यावेळी सांगितले. अस्तित्वात नसलेल्या बोगस आदिवासींची लोकसंख्या वाढवून दाखवण्यात आली आहे. या विभागाने राजकीय, शैक्षणिक, नोकरी व विकास निधीचा घोटाळा केल्याचा आरोपही जानकरांनी यावेळी केला आहे.