आदित्य माझे आशीर्वाद घेण्यासाठी आला नसला तरी आम्ही त्याच्या पाठीशी- राज ठाकरे

0
597

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असताना त्यावर आदित्य यांचे काका, म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत आदित्य यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आदित्य माझे आशीर्वाद घेण्यासाठी आला नसला तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, असे राज म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे पुतण्या राजकारणात पहिले पाऊल ठेवत असताना राज यांनी जाणीवपूर्वक आदित्य यांच्याविरुद्ध उमेदवार दिलेला नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच आभार व्यक्त केले असताना आता राज यांनी आदित्य यांच्या निर्णयाचे उघडपणे समर्थन केले व उद्या माझा मुलगा निवडणूक लढवायची आहे, असे म्हणाला तर मी त्यालाही नाही म्हणणार नाही, असे राज म्हणाले.

आदित्य निवडणूक लढवत असेल तर त्यात चुकीचे काय?, असे विचारत राज यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला. बाळासाहेब व्यंगचित्रकार होते. त्यांच्या हाताचे वळण बिघडेल म्हणून आजोबांनी त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये पाठवले नाही. पण बाळासाहेबांचे सांगायचे तर मला आणि उद्धवला त्यांनी कधीच रोखले नाही. आमच्यावर त्यांनी काहीही लादले नाही. आमच्या मुलांच्या बाबतीतही तेच आहे. ते एखादा निर्णय घेत असतील तर त्यांना आम्ही रोखणार नाही, असे राज म्हणाले.

आदित्य माझ्याबद्दल काय विचार करतो, मला माहीत नाही. पण माझे म्हणाल तर मी त्याच्याबाबत योग्य भूमिका घेतली आहे. प्रत्येकाचे स्वत:चे एक मत असते. आदित्यने स्वत:हून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे समर्थनीयच आहे, असेही राज म्हणाले.