Banner News

आदित्य बिर्ला रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू; रेखा दुबेंना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा निर्णय

By PCB Author

August 27, 2018

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या ७२ वर्षांच्या वयोवृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी (दि. २६) रात्री मृत्यू झाला. या रुग्णाने उपचाराचे ८६ हजार रुपयांचे बिल दिले नाही म्हणून आदित्य बिर्ला रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यानंतर तब्बल दहा दिवस डांबून ठेवले होते. या कालावधीत रुग्णाला जेवण दिले जात नव्हते. तसेच त्यांच्यावर औषधोपचारही केले गेले नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. पोलिसांनी रुग्णाची सुटका केल्यानंतर चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. उपचारादम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. आदित्य बिर्ला रुग्णालयाने त्यांना डाबून ठेवल्यानंतर दहा दिवस जी वागणूक दिली त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका रुग्णाच्या कुटुंबियांनी घेतली आहे.

दशरथ आरडे (वय ७२) असे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर आधी वायसीएममध्ये आणि नंतर पुढील उपचारासाठी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिले. तसेच उपचाराचे ८६ हजार रुपयांचे बिल त्यांच्या हातात ठेवण्यात आले. रुग्ण व त्यांचे कुटुंबिय गरीब असल्यामुळे त्यांनी एवढी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. आपण दारिद्र्य रेषेखाली मोडत असल्यामुळे हे बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे केली. दारिद्र्य रेषेखाली मोडत असल्याचे पुरावेही त्यांनी दिले. परंतु, रुग्णालायाच्या मुजोर मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी बिल माफ करण्यास नकार दिला आणि रुग्णाला डिस्चार्ज दिले नाही.

दरम्यान रुग्णाच्या कुटुंबियांनी वाकड पोलिस आणि धर्मादाय आयुक्त यांना भेटून सर्व माहिती दिली. धर्मादायक आयुक्तांनी रेखा दुबे यांना फोन करून रुग्ण आर्थिक दुर्बल घटकांतील असल्यामुळे उपचाराचा खर्च न घेण्याचे आणि रुग्णाला तातडीने डिस्चार्ज देण्यास सांगितले. वाकड पोलिसांनीही संपर्क साधल्यानंतर रेखा दुबे यांनी रुग्णाला सोडण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात रुग्णाला सोडले नाही. तब्बल दहा दिवस रुग्णाला डांबून ठेवले. रुग्णाच्या कुटुंबियांनाही रुग्णाला भेटू दिले नाही. रुग्णाला जेवण दिले गेले नाही. तसेच औषधोपचारही केले गेले नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबियांनी वाकड पोलिसांत धाव घेऊन लेखी तक्रार केली. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची सुटका करत कुटुंबियांच्या ताब्यात दिले.

जेवण न केल्यामुळे व औषधोपचार न झाल्यामुळे वयोवृद्ध रुग्णाची प्रकृती खालावली होती. त्यामुळे कुटुंबियांनी चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाचे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, आदित्य बिर्ला रुग्णालयात रुग्णाचे जे हाल झाले त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याच आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. काही कुटुंबियांनी वाकड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला असून, आता पोलिस काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.