Maharashtra

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार ?  

By PCB Author

May 27, 2019

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी,  अशी मागणी युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर  एक पोस्ट टाकून  केली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून कोअर कमिटीकडून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येत आहे.   

युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. तसेच हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी  केली आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वीही अशी मागणी झाली होती. तसेच मतदारसंघही निश्चित करण्यात आला होता. परंतु खुद्द आदित्य ठाकरेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील  आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, असे  स्पष्ट केले होते.

दरम्यान,  आदित्य ठाकरे  महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच त्यांनी आदित्य संवाद हा कार्यक्रमदेखील सुरू केला होता.  त्यालाही तरूण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातच अनेक राजकीय बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आता युवासेनेच्या मागणीवर आदित्य ठाकरे काय  उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.