आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत, मात्र सत्ता आणि राजकारणावर अंकुश ठेवतील – संजय राऊत

0
810

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – युवा सेनेचे अध्यक्ष  आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, मात्र सत्ता आणि राजकारणावर अंकुश ठेवतील, असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) येथे स्पष्ट केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून आदित्य ठाकरे लोकसभा  लढवतील, अशी चर्चा सुरु  झाली होती. उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ सेफ आहेत, त्यामुळे या दोन्ही पैकी एका मतदारसंघातून आदित्य ठाकरे  रिंगणात उतरणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कोणीही निवडणूक लढलेली नाही. परंतु आदित्य ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण या बातमीत तथ्य नाही, याबाबत होणाऱ्या चर्चा निराधार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.