आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू

0
444

मुंबई, दि.२८ (पीसीबी)- कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर अशोक चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचे सरकार आता सत्तेत येणार आहे. नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पुन्हा एकदा ही चौकशी सुरू झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुधवारी ईडीने पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू केली. ईडीचे अधिकारी बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटीत दाखल झाले आणि त्यांनी त्यातील घरांची मोजणीही केली. याबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर २०१० मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारला यावरून मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करून तेथील दोन फ्लॅट कुटुंबीयांसाठी घेतले. तसेच ही सोसायटी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधली जात असताना तेथील ४० फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना देण्यासही महसूलमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली, असा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने चव्हाण यांचे नाव या प्रकरणातून वगळण्याची विनंती सीबीआयने केली होती. मात्र, त्याविषयीचा सीबीआयचा अर्ज आधी सीबीआय न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयानेही फेटाळला होता.