आता राहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा

0
335

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन केला. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर महत्त्वाची सूचनाही केली. दरम्यान, ठाकरे पिता-पुत्रांची गांधी यांच्या बरोबर झालेली मोबाईलचर्चा हाच आता राजकीय वर्तुळातील विषय झाला असून उलटसुलट बातम्या सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात मंगळवारी फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोन करून संवाद साधल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसच्या सहभागाविषयी महत्त्वाचं विधान केलं होतं. त्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा त्यांनी नंतर केला. मात्र, तोपर्यंत राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. चर्चांचे पेव फुटल्यानंतर मंगळवारी रात्री राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आणि कोरोनाबद्दल चर्चा झाली. राहुल गांधी यांनी करोनाचा प्रसार थांबवण्याबरोबर करण्यात येत असलेल्या इतर उपाययोजनांबद्दल आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. “मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र, आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवायला हवं. महाराष्ट्र सरकार सध्या चांगलं काम करत आहे,” असं राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना म्हणाले.