Maharashtra

आता राज ठाकरे भाजपच्या प्रचारात

By PCB Author

April 11, 2024

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसेत नाराजीनाट्य सुरू झालं आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात राजीनामे दिले आहेत. मात्र असं असलं तरी राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार की नाही? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं विधान केलं आहे. राज ठाकरे याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक आहे. हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या देशाचं हित महत्त्वाचं आहे. हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला होता. राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे आहे. हा सगळा विचार करून राज यांनी भाजपला पाठिंबा दिला, असं सांगतानाच प्रचाराला जायचं की नाही त्याचा निर्णय अद्यापही नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील. येत्या 13 एप्रिल रोजी राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यात निर्णय जाहीर केला जाईल, असं प्रकाश महाजन म्हणाले.