Desh

आता मोदी विरोधात शरद पवार यांची मोर्चेबांधनी, राष्ट्रवादीच्या बॅनर खाली एकत्र येण्याबाबत साशंकता

By PCB Author

June 21, 2021

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच शरद पवार यांनी उद्या मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 15 पक्षांचे नेते सामील होणार आहेत. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानी गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता शरद पवारांनी उद्या विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचं वृत्त आहे. उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला 15 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रमंच स्थापन केल्यास यूपीएचं काय? भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी यूपीएच्या बॅनरखाली एकत्र येण्याऐवजी नवं बॅनर घेऊन एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यूपीए फेल गेल्याने राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र आल्यास भाजपला धक्का देणं सोपं जाईल. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने राष्टमंच नावानं नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं.

काँग्रेसचं काय होणार? उद्याच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आलं की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस बैठकीला उपस्थित राहिल्यास राष्ट्रमंचच्या बॅनरचा काँग्रेस स्वीकार करणार का? याचेही कुतुहूल वाढले आहे. शिवाय ही आघाडी काँग्रेसला सोबत घेऊन निर्माण होणार की काँग्रेस वगळून ही आघाडी निर्माण होणार याबाबतचा सस्पेन्सही उद्याच्या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.

नेतृत्व पवारांकडे जाणार? सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. त्या आजारी असल्याने यूपीएचं अध्यक्षपद पवारांकडे देण्याची मागणी होत आहे. मात्र, काँग्रेसने पद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रमंच नावानं तिसरा पर्याय निर्माण करून त्यांचं नेतृत्व पवारांकडे दिलं जाण्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळातील भाजप विरोधातील आघाडी पवारांच्या नेतृत्वाखालील असेल की काँग्रेसच्या हे उद्याच्या बैठकीतूनच स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.