‘आता मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही’

0
221

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भाजपा तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असताना एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी केलं आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. बैठकीमधील एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये नियोजन आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री राव इंद्रजित सिंह एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नसल्याचं सांगत आहेत.

“नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदान मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी भाजपाच्या २०१४ मधील मोठ्या विजयाचा उल्लेख करताना म्हटलं की, “केंद्रात मोदींमुळेच भाजपा सत्ता स्थापन करु शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला. हरियाणातही पहिल्यांदा भाजपाने आपलं सरकार स्थापन केलं. दुसऱ्यांदाही भाजपाला यश मिळालं. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते”.

पहिल्यावेळी भाजपाला ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असं सांगताना विजयी आकडेवारी कमी होत असते असं त्यांनी सांगितलं. पण या ४५ जागा आपण राखू शकतो का? याचा विचार करणं गरजेचं आहे असं राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्ते आणि बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं.