आता मुलंच नाही, तर नातवंडही पळवणार; गिरीश महाजनांचा विरोधकांना इशारा  

0
432

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आता मुलंच नाही, तर नातवंडही पळवणार आहोत. त्यांची मुले नातवंडे त्यांना सांभाळता येत नाही का? असा प्रश्न करत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिला आहे. 

एका वृत्तवाहिनीशी महाजन बोलत होते. यावेळी त्यांना ‘मुले पळविणारी टोळी’ असा आरोप भाजपवर केला जात आहे, याबाबत विचारले असता  महाजन म्हणाले की, काही पक्षात आमचे घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायचे काम करायचे का? असा टोलाही त्यांनी विरोधकांना  लगावला.

सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाविषयी  विचारले असता ते म्हणाले की, विखे पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडील कुणी आमच्याकडे येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, केवळ आमच्याकडेच अशी इनकमिंग आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यांच्याकडे धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले हे आमचेच आहेत, असे महाजन  म्हणाले.