“आता मर्यादा संपली. प्राधिकरणाच्या जमिनीवरील बांधकामे ‘फ्री होल्ड’ करून पालिकेकडे हस्तांतरित करा”- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

0
219

पिंपरी,दि.२९(पीसीबी) : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची (पीसीएनटीडीए’) आता मर्यादा संपली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जमिनीवरील बांधकामे फ्री होल्ड करून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी केली.पालिकेकडे टीडीआर, एफएसआय लोडिंगची परवानगी आहे. पण, प्राधिकरण क्षेत्रात नाही. त्यामुळे आता तिथे वाढायला वाव नाही, असेही ते म्हणाले. प्राधिकरण एकच एफएसआय देतो. याबाबत लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्यात येणार आहे.

प्राधिकरणाची काय परिस्थिती आहे याची सविस्तर माहिती घेत, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील विविध समस्या बाबत खासदार बारणे यांनी प्राधिकरण कार्यालय आकुर्डी येथे बैठकीवेळी ते बोलत होते. याप्रसंगी विविध विकास कामांची माहिती, आढावा घेतला. शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याची काय परिस्थिती आहे. विकास आराखड्यात किती आरक्षणे विकसित केली, किती राहिली. मुख्य कार्यकारी आधिकारी बन्सी गवळी व संबंधित आधिकारी तसेच माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, अनिता तुतारे, सरीता साने, अनंत कोऱ्हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, अमोल निकम, शैलेजा निकम, ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र नामदे, धनाजी बारणे या बैठकीस उपस्थित होते.

“प्राधिकरणाने जे सेक्टर विकसित केले आहेत. त्याची रीडेव्हलपमेंट प्लॅनिंग अथोरिटी महापालिकेकडे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येतात. प्राधिकरणाने विकसित केलेल्या सेक्टरचा पुन्हा विकास करण्यासाठी परवानगी करिता पालिकेकडे यावे लागत आहे. तत्कालीन सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. प्राधिकरणाची फ्री होल्ड मालमत्ता नाही. ९९ वर्षांच्या करारावर ती जागा दिली आहे.”, असं खासदार बारणे म्हणाले,