Desh

आता मनासारखे खेळाडू निवडू द्या- रवी शास्त्री

By PCB Author

August 17, 2019

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी)-  भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण होणार या प्रश्नाचे उत्तर अखेरीस मिळाले आहे. १६ ऑगस्ट रोजी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड केली. आगामी २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्री यांच्यासोबत करार करण्यात येणार आहे. मात्र मुलाखतीदरम्यान रवी शास्त्री यांनी क्रिकेट सल्लागार समितीकडे मोठी मागणी केल्याची बातमी समोर येते आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीदरम्यान सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रवी शास्त्री यांनी संघ निवडीदरम्यान आपलं मत विचारात घ्यावे अशी मागणी केली आहे. कित्येकवेळा संघनिवडीदरम्यान कर्णधार विराट निवड समितीसोबत आत आणि मी बाहेर बसल्याचेही शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितले.

“विश्वचषकात मधल्या फळीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला जे खेळाडू हवे होते त्यांची संघात निवड झाली नाही, असे शास्त्री यांना सांगायचे होते. संघ निवडीदरम्यान प्रशिक्षक आणि इतरांचे मत विचारात घेतले जात नसले तरीही शास्त्री यांना संघनिवडीदरम्यान प्रशिक्षकाचे मत विचारात घेतले जाव असे वाटत आहे.” क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्याने माध्यमांशी बोलताना माहिती दिली.