Maharashtra

आता `बाळासाहेबांचा राज` नाटक करणार शिवसेनेतील भाऊबंकीचे प्रदर्शन

By PCB Author

January 17, 2023

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. शिवसेनेच्या याच संघर्षात आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर आधारीत भावनिक संवाद असलेलं एक व्यावसायिक नाटक मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. बंडखोरीने पोखरलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरु असतानाच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यावरील या नाटकाने आणखी एक नवा ट्विस्ट पहायला मिळण्याची शक्यता आहे. या दोन अंकी नाटकाची उत्सुकता तमाम मराठी प्रेक्षकांना लागली आहे.

येत्या 23 जानेवारी रोजी या बाळासाहेबांचा राज या नाटकाचा शुभारंभ होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोहोंमध्ये शिवसेनेचा वाद सुरु असतानाच राज ठाकरे यांचे शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कशा प्रकारचे नाते होते, हे सांगणारे नाटक महाराष्ट्रातील जनतेची अधिक उत्कंठा वाढवणारे ठरू शकते.

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भावनिक नात्यावर भाष्य करणारे मराठी नाते लवकरच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर आधारित नाटकाचा प्रयोग होत आहे. यापूर्वी या व्यक्तिरेखांशी साधर्म्य असलेल्या पात्रांचा हिंदी रंगभूमीवर प्रयोग झाले होते. बाळासाहेबांचा राज या मराठी व्यावसायिक नाटकाचा लवकरच शुभारंभ होत आहे. 23 जानेवारी बाळासाहेबांच्या जन्मदिनी होणार नाटकाचा शुभारंभ होत आहे. अनिकेत बंदरकर नाटकाचे हे या नाटकाचे लेखक-दिगदर्शक आहेत. प्रमोद गांधी निर्माते आणि गणेश कदम यांची प्रमुख निर्मिती आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 4 वाजता शुभारंभाचा प्रयोग आहे.

नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या व्यक्तिरेखा अत्यंत भावनिक पातळीवर साकारण्यात आल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि पक्षाचे आमदार राजू पाटील यांचे नाटकाला मार्गदर्शन लाभले आहे.  मनसे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांचे नाटकाला विशेष सहकार्य लाभले आहे.  ठाण्यात काल अविनाश जाधव यांनी केले नाटकाच्या पोस्टरचे अनावरण केले.