आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार

0
1341

पुणे, दि. १४ (पीसीबी) – फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्वी खून, अपहरण, बलात्कार, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्य़ांत शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांना थेट  कारागृहातून त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य कारागृह प्रशासनाने घेतला होता. मात्र, फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना ही सुविधा नव्हती.

मात्र आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कॉईन बॉक्सचा वापर करून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी नमूद केले. ते म्हणाले, अन्य कैद्यांप्रमाणेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले कैदी कारागृहातून कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतात. मात्र, देशद्रोह, दहशतवादी, नक्षलवादी कारवायांमध्ये ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे असे कैदी या सुविधेचा वापर करू  शकत नाहीत.

राज्यभरातील विविध कारागृहात एकूण ६५ कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यापैकी ५० कैदी कारागृहातून कॉईन बॉक्सचा वापर करून कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतात. त्यासाठी अशा कैद्यांना संबंधित कारागृहातील अधीक्षकांची परवानगी घेणे बंधनकारक असेल, असे उपाध्याय यांनी नमुद केले आहे.