….आता देगलूर – बिलोली पोट निवडणूक निकालाकडे नजर

0
254

नांदेड, दि. १ (पीसीबी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक सध्या चर्चेत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून उद्या ( 2 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. पंढरपूर नंतर आता देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक महाआघाडी आणि भाजपा साठी प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदार महाआघाडीला साथ देतात की नाराजी व्यक्त करतात ते उद्या स्पष्ट होणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे की भाजप हे या निवडणुकीतून काही अंशी दिसणार असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची झाल्याचं जाणकार सांगतात. या निवडणुकीत दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाच वंचित बहुजन आघाडी उच्चशिक्षित उमेदवार देऊन तगडे आव्हान उभे केले आहे.

देगलूर-बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे इथे बेरोजगारी ही प्रमुख समस्या असल्याची सातत्याने ओरड होते. दोन्ही तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची समस्या असल्याची तक्रार मतदार सातत्याने करतात. मतदारसंघात प्रवाही नद्या आहेत पण म्हणावे तसे सिंचन प्रकल्प कोणत्याही राजकीय पक्षाने मार्गी लावले नाहीत. राज्याच्या विधानसभेत देगलूर विधानसभेचा क्रमांक हा 90 आहे. देगलूर विधानसभा क्षेत्रात देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील शेवटचे तालुके आहेत. सध्याची मतदार संख्या सुमारे 2 लाख 98 हजार एवढी आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकांत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून या मतदारसंघाकडे प्रमुख नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं. मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 6 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

जितेश अंतापूरकर
अंतापूरकर यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन प्रथमच निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत सेनेच्या सुभाष साबणे यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 8 हजार मतांनी पराभव केला होता.

2019 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सेनेच्या सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला. या सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या मतदारसंघात अंतापूरकर आणि साबणे हे दोघेच एकमेकांवर मात करत राहिले. पण आता चित्र बदललं आहे. काही महिन्यांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडी असल्याने निवडणूक लढवता येणार नाही म्हणून शिवसेनेचे साबणे हे भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवार झाले आहेत तर वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केलं आहे.

सुभाष साबणे
त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील भाजप मध्ये गेले होते. पण या पोटनिवडणुकीत त्यांचे मनपरिवर्तन झाले अन हे दोघेही भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खतगावकर यांचे देगलूर विधानसभा क्षेत्रात वर्चस्व आहे, असं मानलं जातं. ही निवडणूक महाविकास आघडीच्या नावाखाली लढवली जात आहे त्यामुळे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आहेत. माजी आमदार सुभाष साबणे यांना मात्र काहीही करून पोटनिवडणूक लढवायचीच होती. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपशी घरोबा केला.

डॉ. उत्तम इंगोले
वंचित बहुजन आघाडीदेखील यावेळी निर्णायक ठरणार आहे. डॉ. उत्तम इंगोले यांना वंचित बहुजन आघडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा झाली. या सभेतील गर्दीचे मतदानात रूपांतर झाले तर प्रस्थापित पक्षांना अवघड होणार आहे.

काँग्रेसला या निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना वडिलांच्या निधनामुळे मतदारांची सहानुभूती मिळेल, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जितेश यांच्या प्रचाराच्या धुरा स्वीकारल्याने जनता विश्वास ठेवेल आणि शिवसेना राष्ट्रवादीची ताकत एकत्र येऊन विजय मिळेल असा विश्वास आहे. सुभाष साबणे हे अनेक वर्षांपासून राजकीय जीवनात आहेत. सेनेकडून ते 3 वेळा विधानसभेवर गेले होते त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे.