Maharashtra

आता दिरंगाई केल्यास मनपा बरखास्त करू; औरंगाबादच्या कचराप्रश्नी फडणवीसांचा उग्रावतार

By PCB Author

July 19, 2018

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – कचरामुक्तीसाठी ८९ कोटी रुपये दिले. रस्त्यांसाठी १०० कोटी दिले. पण तुम्ही काहीच केले नाही. दोन दिवस कचरा उचलता आणि आठ दिवस तसाच ठेवता. वर्षभरापूर्वी निधी देऊनही रस्ता कामांच्या साध्या निविदाही तुम्हाला काढता आल्या नाहीत. ही शरमेची बाब आहे. आता जे बोलतोय ती शेवटची ताकीद आहे. जास्त दिरंगाई कराल तर महापालिकाच बरखास्त करून टाकू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (१७ जुलै) दिला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही त्यांनी झापले. दरम्यान, कचरा प्रश्नावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २.१५ ते ३.०० अशा पाऊण तास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी १५ लाख औरंगाबादकरांना कायम वेठीस धरणाऱ्या मनपाच्या कारभाराची अक्षरश: चंपी केली. ९ मार्च रोजी नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी कचरामुक्तीसाठी पाचकलमी कार्यक्रम दिला होता. त्याची मनपाने अंमलबजावणी केलीच नाही. त्याचा थेट उल्लेख न करता फडणवीस म्हणाले की, शहरातील सर्व कचरा कधी उचलून नेला जाणार आहे, याचा व्यवस्थित रोड मॅप दोन दिवसांत सादर करा.