Maharashtra

…आता तेवढे शरद पवारांना भाजपात घेऊ नका – उद्धव ठाकरे

By PCB Author

March 15, 2019

अमरावती, दि. १५ (पीसीबी) – आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजपा नाहीतर शिवसेनेत असायचा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढे शरद पवारांना भाजपात घेऊ नका असे म्हणत चिमटा काढला. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचे कोणावर असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य केले. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिले नाही असे सांगताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून उघड तलवारी काढल्या होत्या, काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतरा असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्र्यांनी मनातून आणि म्यानातून तलवारी काढल्या आहेत असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना भाजपा जनतेची शेवटची अपेक्षा असून आम्ही गेलो तर अंधार पसरेल असे सांगत सर्वसमान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

सर्व्हे म्हणजे अंतिम नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही, आत्मविश्वास हाच माझा विश्वास आहे असे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रात ४८ जागा आपल्याला कमी पडतील असे सांगताना सर्व जागा आपणच जिंकल्या पाहिजेत असे उद्धव ठाकरे बोलले आहेत.