Notifications

आता तुम्ही सांगली आणि कोल्हापुरातील पुरग्रस्तांना करु शकता मदत; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना

By PCB Author

August 09, 2019

पुणे, दि. ९ (पीसीबी) – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने कक्ष उभारून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, मेणबत्त्या, टॉर्च, नवीन शाली, नवीन ब्‍लँकेट, नवीन चटई, रेडी टू इट असे खाद्यपदार्थ द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. कक्षाकडे जमा होणारी मदत विभागीय आयुक्‍त कार्यालयातील मदत केंद्राशी समन्‍वय साधून पुरग्रस्‍तांकडे पाठविण्‍यात येईल, असे सांगून जिल्‍हाधिकारी राम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीलाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍ह्यातील पूरस्थितीचा आढावाही घेण्‍यात आला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातील अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

समन्वय अधिकारी –

कोल्हापुरसाठी अजय पवार(उपजिल्हाधिकारी) मो. क्र. ८८५६८०१७०५, आरती भोसले (उपजिल्हाधिकारी) – ९८२२३३२२९८, नीता शिंदे (उपजिल्हाधिकारी) – ९४२१११८४४६ तर सांगलीसाठी भारत वाघमारे   (उपजिल्हाधिकारी) – ९८५०७९११११, सुरेखा माने (उपजिल्हाधिकारी) – ७७७५९०५३१५, रवी कोळगे (स्‍वी. सा.) – ९५११२५१४७५. पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.