“आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार…कोल्हेला पाडणार”; शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात फलकबाजी

0
867

पुणे, दि. १६ (पीसीबी) – शिवसेनेला जय महाराष्ट्र करून हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरुरमधून लोकसभेची  उमेदवारी देण्यात आली आहे.  मात्र,  त्यांच्या  उमेदवारीवर स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही आमची ताकत दाखवणार’, असे थेट आव्हान देणारे फलक शिरूर मतदारसंघातील  भररस्त्यामध्ये लावून राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कोल्हेंच्या  उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.  

“आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार…कोल्हे ला पाडणार” अशा आशयाचे फलक  शिरुर मतदारसंघात भररस्त्यात लावण्यात आले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात  एकच खळबळ उडाली आहे.  राष्ट्रवादीच्या सागर डुंबरे नावाच्या कार्यकर्त्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ही फलकबाजी केल्याचे समजत आहे. लांडे साहेबांनी अडचणीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेंना पाडणार, असे फलकवर लिहिण्यात आले आहे.

अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर, त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडणार, असा मजकूर लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, या फलकमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शुक्रवारी शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे  येथे  शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.  तर २००९ मध्ये शिरूरमधून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, यावेळेला  उमेदवारी मिळण्यासाठी लांडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यांना डावलून कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लांडेचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत.