Videsh

आता चेंडू कुरतडणे गंभीर गुन्हा; आयसीसीचा निर्णय

By PCB Author

July 03, 2018

दुबई, दि. ३ (पीसीबी) – क्रिकेटच्या मैदानावरील चेंडू कुरतडण्याच्या घटना रोखण्यासाठी  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर नियम करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे चेंडू कुरतडण्यासारखा प्रकार घडल्यास हा तिसऱ्या दर्जाचा गुन्हा ठरवण्यात येईल. या   प्रकरणातील दोषी खेळाडूवर ६ कसोटी वा १२ एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात येणार  आहे.

डब्लिन येथे आयसीसीच्या वार्षिक सभेत या नियमांना मंजुरी देण्यात आली. क्रिकेटमधील  वाढत्या गैरप्रकारांना आणि खेळाडूंच्या असभ्य वर्तनाला आळा घालण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. आयसीसीच्या नियमानुसार यापूर्वी चेंडू कुरतडण्यासारखा प्रकार दुसऱ्या दर्जाचा गुन्हा ठरवला जायचा. मात्र, यापुढे तो तिसऱ्या दर्जाचा अधिक गंभीर गुन्हा ठरणार आहे.

दरम्यान, केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बँक्रॉफ्ट हे चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळले होते. या प्रकरणामुळे क्रिकेटमधील गैरप्रकार उघड झाला होता. त्यावेळी चेंडू कुरतडणे हा गंभीर गुन्हा ठरवावा, अशी मागणी क्रिकेट विश्वातून केली जात होती.