Maharashtra

आता घराबाहेर पडलात तर संपूर्ण पिढीसला त्याचे परिणाम भोगावे लागतील – शरद पवार

By PCB Author

March 30, 2020

 

मुंबई दि.३० (पीसीबी) – “राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतनाजनक आहे. लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे. आता घराबाहेर पडलात तर संपूर्ण पिढीसला त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेशी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शनही केले.

“कोणीही आपल्या घराबाहेर पडू नका. मी देखील बरेच दिवस घराबाहेर पडलो नाही. घराबाहेर पडलो तर अख्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील. संकटाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे व्यवस्थाही मोठी करावी लागेल. राज्य सरकार या संकटाशी झटत आहे,” असे पवार यावेळी म्हणाले. तसेच करोनाचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे असंही त्यांनी नमूद केले.

काही खासगी डॉक्टरांनी आपली सेवा देणं थांबवलं आहे. हे अतिशय दुखद आहे. कोणीही वैद्यकीय सेवा देण्याचं काम थांबवू नका. आज देशासमोर मोठं आर्थिक संकट आहे. येत्या काळात आपल्याला काटकसरीची सवय करावी लागणार आहे,” असं ते यावेळी म्हणाले. “करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. “सध्या देशात योग्य प्रमाणात अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. आरोग्य शिबीरे घेण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल,” असे म्हणत सूचनांची अंमलबजावणी करा असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.