आता कहर झाला…राज्याचे मुख्य सचिवांनाच कोरोनाची बाधा

0
403

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे कार्यालयातील शंभर टक्के उपस्थितीचे बंधन रद्द करावे, यासाठी अधिकारी महासंघाने नुकतेच आंदोलन केले होते.
मुख्य सचिवांसह राज्यातील प्रमुख मंत्रीही सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत. त्या आधी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली.

याशिवाय महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दोन दिवसांपूर्वीच हाती घेतलेले एच. के. पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रदेश काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांच्या सूत्रे स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला, बैठकीला राज्यातील काँग्रेसचे जवळपास सर्वच मंत्री, नेते उपस्थित होते. प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, नसीम खान आदी नेते पाटील यांच्या शेजारीच बसलेले होते. त्यामुळे त्यांनाही काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते आज राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना कृषी कायद्यांच्या विरोधात भेटणार होते. मात्र पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इतर नेत्यांना राजभवनावर जाण्यास सांगितले आहे.