Desh

आता कसे वाचता ते बघतोच; मोदींचा राहुल, सोनिया गांधींना इशारा  

By PCB Author

December 05, 2018

जयपूर, दि. ५ (पीसीबी) – ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात  आम्ही  सर्वोच्च न्यायालयात जिंकलो आहे.  त्यामुळे केंद्र सरकारला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्राप्तिकराचे पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार आहे. आता कसे वाचाल ते बघतोच, असा  इशारा  पंतप्रधान मोदी यांनी  दिला आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर मोदी यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे.

पंतप्रधान मोदी आज (बुधवार)  राजस्थानमधील सुमेरपूर येथे जाहीर सभेत बोलत होते.  आता बड्या लोकांचे बिंग फुटणार, ही गोष्ट कुठवर जाईल काहीच माहित नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले. राजस्थानमध्ये मी जिथेही जात आहे, तेथील चित्र पाहून राजस्थानच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा  दावा मोदींनी  यावेळी केला.

दरम्यान, ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात  राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नाडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास मंगळवारी  सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. यावर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.