‘…आता कसं वाटतं, गार गार वाटतं’; उपमुख्यमंत्री अजितदादांचा भाजपाला चिमटा

0
235

पुणे, दि.२६ (पीसीबी) – “भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली. सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटलं. तीन चार महिन्यात काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं…आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे,” असा चिमटा त्यांनी काढला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर उपहासात्मक टीका करताना काही नेते संपर्कात असल्याच्या दाव्यासंबंधी भाष्य करताना टोला लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी त्यांनी भाष्य केलं.

पुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना टोला-
“सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,” असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी आंदोलनावरुन टीका-
“आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आमचं आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.