आता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय? – मुख्यमंत्री

0
924

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रिया क्रुझवर काढलेल्या सेल्फीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना आज (मंगळवार) एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात छेडले असता त्यांनी अनोख्या अंदाजात उत्तर दिले. आजवर महाराष्ट्राने तरूण मुख्यमंत्री पाहिलेला नाही. तरूण मुख्यमंत्र्यांची तरूण पत्नीही पाहिलेली नाही. आता आमचे वयच सेल्फी काढण्याचे आहे आणि त्यांनी सेल्फी काढला, त्यात गैर काय? असा प्रतिसवाल  मुख्यमंत्र्यांनी केला.

अनेक लोक लपून छपून  सेल्फी काढत असतात. तर अनेक जण उघडपणे सेल्फी काढत असतात. अमृता फडणवीस या माझ्या पत्नी  आहेत. तरीही त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी काय करायचे हे मी ठरवत नसतो, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.  मात्र, मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांची सुरक्षित स्थळी जाऊन सेल्फी घेणे ही  त्यांची जबाबदारी नाही का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, त्यावेळी मीडियाने कॅमेरा अँगल चुकीचा लावला होता, अशी सारवासारव त्यांनी यावेळी केली.

मी, अमृता फडणवीस आणि नितीन गडकरी आंग्रिया क्रुझवर गेलो. त्यानंतर अप्पर डेकवर  गेलो, तेव्हा सगळ्यांच्या समोर अप्पर डेकवर मी बसू का ? अशी परवानगी अमृता फडणवीस यांनी घेतली होती. त्या अप्पर डेकवर बसून सेल्फी घेत होत्या. तेव्हा फोटोचा अँगल असा प्रकारे लावला की, त्या समुद्रातच पडत आहे, असे वाटत होते. मात्र, त्या  डेकच्या खाली लोअर डेक होता,  असे मुख्यमंत्र्यांनी सांगून पत्नी अमृता यांची पाठराखण केली.