Maharashtra

आता आंदोलन नको; १ डिसेंबरला जल्लोष करा – मुख्यमंत्री  

By PCB Author

November 15, 2018

अहमदनगर, दि. १५(पीसीबी) –  राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील अहवाल आज (गुरूवार) राज्य सरकारला  सादर केला आहे. या अहवालावर अभ्यास करुन सरकारकडून पुढची पावले उचलली जाणार आहेत. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे श्रेयवादात न अडकता १ डिसेंबरला जल्लोष करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  

मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत अहवाल  सादर झाला आहे. काही दिवसात उर्वरीत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, काही लोक अजूनही आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. सरकार निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा १ डिसेंबरला जल्लोष करा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या महिन्याअखेर  राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षणावरुन कुणीही श्रेयाची लढाई करू नये. एक समाज मोठ्या संख्येने एकत्रित आला, त्यामुळे त्या समाजाच्या पाठिशी उभे राहिल्याने हे सर्व निर्णय होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.