आताची काँग्रेस ही एकाच कुटुंबाचा विचार करणारी – प्रकाश जावडेकर

0
351

मुंबई, दि, १३ (पीसीबी) – पूर्वीची काँग्रेस ही देशाचा विचार करणारी होती. परंतु आताची काँग्रेस ही केवळ एकाच कुटुंबाचा विचार करणारी आहे. एका कुटुंबाच्याच स्वार्थामुळे आज काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

आता काँग्रेसची जिद्द संपली आहे. त्यांची राजकीय दृष्टी ही एका परिवाराच्या बाहेर जात नाही. त्यामुळेच त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली होती. परंतु त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची सत्ता असलेल्याच राज्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे जावडेकर यावेळी म्हणाले. भारतीय मतदार हा सुजाण आहे. त्याला कधीही कमी समजू नये. निवडणुकीदरम्यान मी चार महिने राजस्थानमध्ये होते. तेव्हा एक शेतमजूर महिला आपल्याशी बोलायला आली. त्यावेळी त्या महिलेने आम्ही पंतप्रधान मोदींनाच मत देणार असल्याचे म्हटले. मोदी हे गरीब कुटुंबातून वर आले आहेत. त्यांना गरीबीची आणि त्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असे त्या म्हणाल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अन्य पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्यांबाबतही वक्तव्य केले. लोकांना आता काँग्रेसमध्ये भविष्य वाटत नाही. विखे-पाटीलही भाजपात येणे हे नैसर्गिकच आहे. मोदींच्या नेतृत्वाची लोकांना आशा वाटते. भाजपामध्ये अनेक दिग्गज नेते झाले. परंतु त्यापैकी कोणीही घराणेशाहीतून किंना पैशाच्या जोरावर वाढले नाही. सर्वजण आपल्या मेहनतीच्या जोरावर पुढे आले आहेत. भाजपामध्ये घराणेशाही नाही. तसेच पक्ष चालवणारी माणसेही घराणेशाहीतून आलेली नाहीत, असेही ते म्हणाले. काँग्रेसला आज आत्मपरिक्षणाची गरज आहे. पक्षाला आज अध्यक्ष नाही त्याचीही जबाबदारी भाजपाचीच आहे? का असा सवालही त्यांनी यावेळी केला. सध्या पक्षाची कामगिरी महत्त्वाची आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण घराणेशाहीतून पुढे आले आहेत. त्यांच्याकडे आज देशभरात फिरणारा नेता नाही. एका कुटुंबाच्याच स्वार्थामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.