Maharashtra

आण्णा हजारेंनी सरकार विरोधात उपोषण करून दाखवावे प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By PCB Author

February 06, 2020

मुंबई, दि.६ (पीसीबी) – NRC, CAA आणि NPR कायद्याविरोधात चाललेला लढा आता तीव्र होणार असून दिल्लीच्या जंतरमंतरवर येत्य ४ मार्च रोजी आंदोलनाला सुरवात होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, भांडुप येथील जकेरीया मैदानात काल रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, अण्णा हजारे हे नेहमी कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन, उपोषण करीत आले आहे, आता थोडीसी माणुसकी असेल तर मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी या सरकार विरोधात उपोषण करावे, या सरकारचा जगभरात विरोध होत असून कोट्यवधी भारतीय जे परदेशात राहत आहेत, ते या सरकारवर नाराज असल्याचे यावेळी बोलले

देशात अनेक ठिकाणी डिटेक्शन कॅम्प तयार करण्यात येत असून महाराष्ट्रात ही असे कॅम्प तयार करण्यात आले असल्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले असले तरी ते आपल्यासाठी नसल्याचेही ते सांगत आहेत, या देशातील १६ टक्के नागरिक आजही गावोगावी भटकत असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत, अश्या लोकांना ७० वर्षात कोणत्याही सरकारने हक्काची जागा दिली नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले अशीच परिस्थिती आदिवासिंची आहे, त्यांची संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्यासाठी वेगळे नियम कायदे असावे असे बाबासाहेबांनी सांगितले होते, जमीन असूनही त्यावर त्यांचा हक्क नसतो, कारण सातबारावर त्यांचे नावे नसतात, पिढ्यानपिढ्या ते जमीन कसतात मात्र मालकी हक्क नसल्याने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नाहीत, असे आदिवासी साडेसात टक्के आहेत, तर १४ टक्के OBC कडे ही कागदपत्रे नाहीत, अश्या लोकांना संसदे मार्फत बेदखल करण्याचे काम चालू आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना या देशात पुन्हा एकदा महात्मा फुलेंना जन्माला घालायचे नाही, कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनीच सर्वप्रथम या मनुवादला विरोध केला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पाकिस्तानातील बलुचिस्तान मध्ये मुस्लिम लोकांवर अत्याचार होत असल्याने त्या विरोधात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते, आता मात्र कायदा तयार करून त्याच मुस्लिमांना या देशात घेण्यास नकार दिला आहे, आपण प्रत्येक ठिकाणी जे बोलतात तसे करीत नसल्याने जगातून आता विचारणा करण्यात येत आहे की मोदींचे खरे राजकारण काय आहे, नक्की तुमच्या कोणत्या विधानावर विश्वास ठेवावा, गेल्या दीड महिन्यापासून कोणताही देश मोदींना निमंत्रण देत नसल्याने मोदी आपल्याच देशात निर्वासित झालेत, भारतात कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे, त्याची माहिती घेण्यासाठी NPR कायदा काढण्यात आला, त्यानंतर इतर कायद्याची अंमलबजावणी करण्याचे धोरण हे सरकार राबविणार आहे, आसाम मध्ये १९ लाख नागरिकांकडे कागदपत्रे नसून त्यात 4 लाख मुस्लिम आहेत, कागदपत्रे नसल्याने त्यांचे नागरिकत्व जाणार आहे.

त्यासाठी या कायद्याची माहिती व्हावी लोकांनी जागरूक व्हावे, या साठी लोकांपर्यंत पत्रक वाटावीत, RSS सांगत आहे हिंदूंना कोणत्याही प्रकारची भीती नाही, मग राजकारणी लोकांनी स्वतःच्या पक्ष्याच्या नावाखाली या कायद्यांना विरोध करून दाखवावा, सद्यातरी या कायद्याला सामान्य जनता विरोध करीत आहे, मात्र राजकारणी या कायद्याविरोधात लढा देताना दिसत नाही, येत्या १ एप्रिल पासून NPR कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, तेव्हा घरी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे द्यायची नाही, दिल्लीला शाहीन बागेत गेल्या ५० दिवसापासून आंदोलन सुरू असून त्यांनी हे आंदोलन असेच चालू ठेवले पाहिजे, त्यासाठी आता आपल्याला दिल्लीला जाऊन आंदोलन करण्याची गरज आहे, तेव्हा येत्या ४ मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी सर्वानी एकत्र या, आणि या कायद्याला विरोध करा, आता आपल्याला साडेचार वर्ष लढा द्यायचा आहे, त्यासाठी आपली ताकद संपवू देऊ नका, असेही आवाहन शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी केले.