Desh

आणि शेवटी मुख्यमंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागेल

By PCB Author

April 12, 2021

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – आधी परमबीर सिंग आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रानंतर महाराष्ट्र सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. या पत्रांमधून आरोप करण्यात आल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता “महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी रामदास आठवले यांनी परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांचा संदर्भ देत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं’, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये केला आहे. त्याचा तपास सध्या सीबीआय करत असून या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची देखील चौकशी केली जात आहे.

“महाविकासआघाडी सरकारने करोनाच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती अधिक बिघडविली” येत्या काही दिवसांत अजून नोटिसा जातील! यासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले, “माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर लावला आहे. देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. मला वाटतं की अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधले सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरेंना देखील राजीनामा द्यावा लागेल”.

दरम्यान, यावेळी रामदास आठवलेंनी करोनाबाबत देखील राज्य सरकारला सुनावलं. “ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गर्दी होत आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करायला हवा. मजुरांना याचा फटका बसता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. पण राज्य सरकारने योग्य ती पाऊलं उचललं नाहीत म्हणून राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत”, असा आरोप त्यांनी लावला.