….. आणि प्रभाग रचनेचे काम सुरु; शहराच्या उत्तरेकडून सुरुवात

0
422

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या कामाला गती दिली. तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नगररचना उपसंचालक, नगर रचनाकार, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरेखक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांचा समावेश असलेली 25 अधिका-यांची समिती कच्चा प्रारुप आराखड्याचे काम करत आहे.

आगामी महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिका-यांची बैठक घेतली. प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. शहराच्या उत्तर दिशेकडून म्हणजेच तळवडेमधून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेवट दक्षिण दिशेला होणार आहे. सांगवी किंवा रावेतला प्रभाग रचनेचा शेवट होऊ शकतो.

2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी) 2 लाख 73 हजार 810 तर अनुसूचित जमाती (एसटी) 36 हजार 535 लोकसंख्या आहे. 128 नगरसेवक असणार आहेत. एकूण 43 प्रभाग राहणार आहेत. 42 प्रभागात 3 तर एका प्रभागात 2 उमेदवार असणार आहेत. प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील. अंदाजे 36 ते 44 हजार नागरिकांचा एक प्रभाग राहील. तर, 35 ते 40 हजार मतदारसंख्या असेल.

अशी होणार प्रभाग रचना!

प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकडी त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी.

प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊव निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही. याची दक्षता घ्यावी. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हेनंबर यांचे उल्लेख यावेत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

‘हे’ अधिकारी करताहेत प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा!

नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, नगररचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, बापू गायकवाड, उपअभियंता चंद्रकांत मुठाळ, सुनील अहिरे, सोहन निकम, कनिष्ठ अभियंता प्रवीण धुमाळ, अश्लेश चव्हाण, प्रसाद देशमुख, चंद्रकांत कुंभार, किरण सगर, विकास घारे, हेमंत घोड, स्वप्नील शिर्के, आरेखक नवनीत ढावरे, शमीर पटेल, रुपाली निकम आणि कॉप्युटर ऑपरेटर सचिन राणे या 25 जणांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”प्रभाग रचनेबाबत आयुक्तांनी अधिका-यांची बैठक घेतली. त्यात काम सुरु करण्याचे आदेश दिले. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नाही”.