“….आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं”: ठाकरेंचा फडणवीसांना टोला

0
233

मुंबई, दि.१ (पीसीबी) : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेकडून सातत्यानं केला जातो. तर असा कुठलाही शब्द दिला नसल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावलाय. ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे. ‘मंत्रालयात वॉर रुम होती. मी विचार केला की वॉर कुणाशी करायचं? म्हणून मी त्यांच नाव बदलून संकल्प कक्ष केलं आहे. नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण कोरोनामुळे तिथले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागले. आता परत त्याला चालना देत आहोत’, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्याने वाक् युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी डिसेंबर 2020 मध्ये औरंगाबादेत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी एक मिश्कील टिप्पणी केली होती. अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी निमंत्रण देत असतात. त्यांना मी इतकेच सांगतो की, तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तर ठाकरे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आशावादी आहेत, याचा मला आनंद आहे. त्यांना 50 वर्षे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. भावी सहकारी म्हणून भाजपचा उल्लेख तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना भाजपचा भावी सहकारी असा उल्लेख केला होता. त्यावर “मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.