Maharashtra

आठवलेंना मुख्यमंत्रीपद द्या, पण एकदाचे सरकार स्थापन करा !

By PCB Author

October 30, 2019

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला पसंती दिली. गेल्या हंगामाच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये घट झाली असली तरीही सत्ता स्थापनेची पहिली संधी ही महायुतीकडेच आहे. मात्र गेले काही दिवस शिवसेना-भाजपात सत्तास्थापनेवरुन सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. शिवसेना सत्तास्थापनेत ५०-५० च्या सुत्राप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे. मात्र भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला कोणत्याही प्रकारे असा शब्द देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी टोला लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेना-भाजपात सध्या सत्तास्थापनेवर नाट्य सुरु आहे. “दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. या नाटकातून दोन्ही पक्षांचे चारित्र्य जनतेला कळत आहे. भाजपा-शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे सत्ता स्थापन करणे त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा तर मंगळवारी भाजपाचा मुख्यमंत्री करा आणि राहिलेला रविवार आठवले साहेबांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचे सरकार स्थापन करा”, अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपा-सेनेला टोला लगावला आहे. याचसोबत भाजपा-शिवसेनेचे नेते जनतेला मूर्ख बनवत असल्याचेही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसेच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका नेत्याने दिली. तसेच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.