“आज ७२ तास झाले. पण, चंद्रकांत पाटलांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळत नाही”: काँग्रेसचा पाटलांना चिमटा

0
402

मुंबई, दि. २१ (पीसीबी) -“मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत तुम्हाला कळेल”, असं मोठं विधान काहीच दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. गुरुवारी (१६ सप्टेंबर) पुण्यात एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. “आज ७२ तास उलटून गेले. पण, चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळत नाही. आम्ही सकाळपासूनच उत्सुक आहोत की, केव्हा एकदा चंद्रकांत पाटील शपथ घेतील”, असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.


“चंद्रकांत पाटील यांनी सर्व विषय बाजूला सारून आम्हाला हे सांगावं की ते शपथ केव्हा घेणार आहेत? आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आज ७२ तास उलटून गेले. मात्र, चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. कधी एकदा चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतील यासाठी आम्ही सकाळपासूनच उत्सुक आहोत”, असं म्हणत सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.


पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, “देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो. तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री यांनी यांनी पुढे यावं. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका. आगामी दोन तीन दिवसांत काही घटना घडेल. आता जे चाललंय ते चालू द्या.”


सचिन सावंत यांनी यावेळी भाजपा आमदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली आहे. “किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांना घेऊन चर्चेत राहायचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सध्या नाटक कंपन्या बंद आहेत. परंतु, किरीट सोमय्या सध्या लोकांचं मनोरंजन करत, नाटक करत आहेत. आता ते लोकांचं मनोरंजन करत असतील तर आम्ही का थांबवावं? पण त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे मनोरंजन करावं”, अशी बोचरी टीका देखील यावेळी सचिन सावंत यांनी केली आहे.

“तुम्हाला तक्रारी करायच्या असतील तर करा. मात्र, चौकशी करण्याचे आदेश देणं आणि चौकशी करणं हे ईडीचं काम आहे. भारतीय जनता पार्टीचं नाही. पण, भारतीय जनता पार्टीने ईडीचं ऑफिस आपल्याच ऑफिसमध्ये चालू केलं आहे का? हेही लक्षात घ्यायला हवं”, असं म्हणत यावेळी सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.