आज मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकीट दरात हंगामी १० टक्के भाडेवाढ

0
588

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – ऐन दिवाळी सणात नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसटी महामंडळांने आज (बुधवार)  मध्यरात्रीपासून २०  नोव्हेंबर पर्यंत हंगामी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग चौथ्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत हंगामी भाडेवाढ  कऱण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीत प्रवास करताना प्रवाशांना जादे पैसे मोजावे लागणार आहेत.  

वीस दिवसांसाठी म्हणजेच १ ते २० नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ असेल. राज्यातील एसटीच्या सर्व आगारात याबाबतच्या सुचना देण्यात आल्या असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात सेवा निहाय १०, १५ आणि २० टक्के भाडेवाढ होती. यंदा, मात्र एकसमान अशी दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार एसटीच्या उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांना आहे. एसटीच्या दरापेक्षा दीडपट दरवाढ करण्याची परवानगी  खाजगी बस चालकांना  आहे. त्यामुळे खासगी बसच्या दरात सुध्दा वाढ होणार आहे. एकूणच या दरवाढीमुळे  प्रवाशांना अधिक पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.