‘…आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही’; भाजप नेत्याची पवारांवर बोचरी टीका

0
278

मुंबई, दि.२९ (पीसीबी) : राज्याला सध्या पुराचा मोठा फटका बसला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुराने हाहाकार माजला आहे. शासनाकडून या भागांची पाहणी तर सुरु आहेच, मात्र अनेक राजकीय नेतेही पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. मात्र, नेत्यांच्या दौऱ्यांमुळे सगळी यंत्रणा नेत्यांच्याच मागे लागते, त्यामुळे नेत्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करू नयेत, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. मात्र, त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या चिपळूण दौऱ्यावरुन सदाभाऊ खोतांनी पवारांवर टीका केली आहे.

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावरुन सदाभाऊ खोत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही. कर्जत-जामखेडचे आमदार चिपळूणच्या दौऱ्यावर ! आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. पवारांच्या आवाहनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांनी चिपळूण दौरा करत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कोकणात अतिवृष्टीमुळं आणि दरडी कोसळून झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे. या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना मदतीचं आवाहन केलं.