आजपासून महाराष्ट्र बंद: मराठा क्रांती मोर्चाची हाक; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
510

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – कायगाव येथील गोदावरी नदीत मराठा क्रांती मोर्चा जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेले काकासाहेब शिंदे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. घटनेचे गांभीर्य बघता आज (सोमवार)पासूनच महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावा, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे. तोवर मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सकाल मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. मात्र, यावेळेस शांततेत नव्हे तर ठोक आंदोलन सुरु केले आहे. यात बस फोडणे, जाळपोळ करणे, ठिय्या, उपोषण, बोंबा मारो अशा विविध मार्गेने आंदोलन सुरु झाली आहेत. सोमवारी कायगाय येथे प्रथम ठिय्या व नंतर जलसमाधी आंदोलन ठरले होते. त्या दृष्टीने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना करणे नितांत गरजचे होते. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष केले गेले.

पोलिस काकासाहेब शिंदे यांना उडी घेण्यापासून वाचवू शकले नाही. तसेच उडी घेतल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यात दुर्दैवी काकासाहेब या २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळले असून संतप्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मृत्याचा नातेवाईकास नोकरी द्यावी. ५० लाख रुपये आर्थिक मदत तातडीने द्या. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जिल्हाधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रमुख मागण्या पूर्ण केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला जाईल, अशा प्रकारचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यासाठी आज (सोमवार) पासूनच महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे.