आजपासून नेहरुनगरमधील जम्बो कोविड केअर सेंटर बंद होणार

0
231

पिंपरी, दि.०१ (पीसीबी) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती नेहरूनगर येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याची पाहता नेहरुनगर येथील जम्बो कोविड सेंटर आजपासून बंद होणार आहे. या पुढे या सेंटरमध्ये नवीन रुग्णांची भरती केली जाणार नसल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी ‘एमपीसी न्यूजशी’ बोलताना सांगितले. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्याबाबत ससून रुग्णालयातील डीन यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. आता शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे या सेंटरमध्ये आजपासून नवीन रुग्ण भरती केले जाणार नाहीत. कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत. सध्या या कोविड सेंटरमध्ये 100 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

रुग्णांची परिस्थिती पाहून दुसरीकडे हलविण्याबाबत ससून रुग्णालयातील अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेणार आहे. या रुग्णांना दुस-या रुग्णालयात शिफ्ट करणे शक्य नसल्यास हे रुग्ण बरे होईपर्यंत जम्बो सेंटर चालू ठेवले जाईल. त्यानंतर जम्बो सेंटर पूर्णपणे बंद होईल. सेंटरमध्ये सध्या 100 रुग्णच उपचार घेत आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये जागा आहे. एवढे मोठे सेंटर चालू ठेवणे योग्य नाही. त्यामुळे ते बंद करण्यात येत आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) आयुक्त सुहास दिवसे म्हणाले, ”नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आजपासून नवीन रुग्णांना दाखल केलं जाणार नाही. रुग्णसंख्या कमी झाली आहे.दरम्यान, जम्बो कोविड केअर सेंटरची देखभाल करण्यात येणार आहे. स्वच्छता ठेवली जाणार आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली. तर, सेंटर चालू केले जाणार आहे.