आचारसंहिता लागू होताच पोलिसांनी पाठवली ६४४ जणांना नोटीस

0
491

औरंगाबाद, दि.२२ (पीसीबी) –  मागील निवडणुकांमध्ये शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. ते लवकरच निकाली लागतील. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होताच सुरवातीला ६४४ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी औरंगाबाद येथे दिली.पत्रकार परिषदेत मकवाना म्हणाल्या, निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. अशा सर्वांना निवडणुकीच्या अनुषंगाने नोटिसा पाठविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याच वेळी बोलतना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले,जिल्ह्यातील नऊही विधानसभा क्षेत्रांत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी केलेली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यास शुक्रवारपासून (ता.27) सुरवात होत आहे. नामनिर्देशन पत्र भरावयाच्या तारखेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील एका बूथवर एक हजार 500 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. त्यानुसार जिल्ह्यात दोन हजार 957 मूळ मतदान केंद्र व 67 साहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण तीन हजार 24 मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी 16 हजार अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही  चौधरी यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पार पाडण्यात आल्या आहेत, असे सांगितले.

 

जिल्ह्यातील चित्र

  • एकूण मतदान केंद्र : ३०२४
    पुरुष मतदार : १५ लाख ३ हजार ६०
    महिला मतदार : १३ लाख ४६ हजार ६६९
    इतर : २६
    एकूण मतदार : २८ लाख ४९ हजार ७५५